Advertisement

कधीही पराभव न पाहिलेल्या बॉक्सरचा रिंगमध्येच धक्कादायक अंत

प्रजापत्र | Thursday, 19/05/2022
बातमी शेअर करा

खेळाच्या मैदानात दुखापती होणं ही काही नवीन गोष्ट नाही. काही वेळा तर दुखापत इतकी गंभीर असते की त्यात खेळाडूला आपला जीवही गमवावा लागतो. असा एक विचित्र प्रकार जर्मनीच्या म्युनिच शहरात घडला. तेथे सामना सुरू असताना एका बॉक्सरचा जागीच मृत्यू झाला. म्युनिच मध्ये सुरू असलेल्या एका बॉक्सिंग सामन्यात दरम्यान मूसा यमक (Boxer Musa Yamak) याचा मृत्यू झाला. बॉक्सर मूसा यमक याचा मृत्यू सामन्यातच झाला, पण त्याचे कारण कुठल्याही प्रकारची दुखापत नव्हती. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने झाला.

 

 

तुर्कस्तानचे प्रतिनिधित्व करणारा बॉक्सर मुसा यमक हा युगांडाच्या प्रतिस्पर्धी बॉक्सरशी बॉक्सिंग रिंगमध्ये दोन हात करत होता. त्यावेळी अचानक युगांडाच्या बॉक्सरने पंच मारल्यामुळे मुसा यमक जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध पडला. मुसाच्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू होते. जे-जे लोक या सामना लाईव्ह पाहत होते, त्यांना या प्रकारामुळे धक्काच बसला.

 

 

मुसा यमकने पहिल्या दोन राऊंडमध्ये चांगली झुंज दिली होती. पण तिसऱ्या राऊंडच्या सुरूवातीलाच तो बॉक्सिंग रिंगमध्ये जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले, त्यावेळी त्याला मृत घोषित करण्यात आले.

 

 

मुसा हा मूळचा तुर्कस्तानी असला तरी जर्मन नागरिक होता. २०१७ साली त्याने बॉक्सिंग सुरू केले. महत्त्वाची बाब म्हणजे २०१७ पासून बॉक्सिंग रिंगमध्ये खेळायला सुरूवात केल्यानंतर तो एकही सामना हरला नव्हता. मुसाचा बॉक्सिंगमधील रेकॉर्ड ८-० असा होता. पण रविवारी मात्र दुर्दैवाने तो जीवनाचा सामनाच हरला.  
 

Advertisement

Advertisement