काँग्रेसचे पंजाबमधील नेते आणि माजी भारतीय क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 34 वर्षांपूर्वी सिद्धू आणि त्यांच्या एका मित्राने केलेल्या मारहाणीत गुरनाम सिंगच्या नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने 1 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांच्या 34 वर्षे जुन्या रोडरेज केसमध्ये सर्वोच्च न्यायालयने आज निर्णय दिला. यापूर्वी पंजाब-हरियाना उच्च न्यायालयाने सिद्धूंना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठावला होता. तर सर्वोच्च न्यायालयाने सिद्दूला या आरोपांतून मुक्त केले होते, तसेच मारहाण प्रकरणी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. पण, आता त्यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नेमकी काय घटना आहे?
27 डिसेंबर 1988 मध्ये ही घटना घडली होती. सिद्धूने पटियालामध्ये रस्त्याच्या मधोमध जिप्सी पार्क केली होती. या मार्गावरून मृत 65 वर्षीय व्यक्ती आणि अन्य दोघे बँकेत पैसे काढण्यासाठी जात होते. यावेळी त्यांनी सिद्धूला गाडी बाजुला घेण्यास सांगितले. यातून वाद झाला आणि सिद्धू आणि त्याच्या सहकाऱ्याने मारहाण केली. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोप केला होता की, सिद्धू हे मारहाण करून पसार झाले होते.
सप्टेंबर 1999 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने नवजोत सिंग सिद्धूला निर्दोष सोडले होते. परंतू उच्च न्यायालयाने डिसेंबर 2006 मध्ये सिद्धू आणि अन्य एकाला दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याला सिद्धूने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मृताच्या नातेवाईकांनी रिव्हू पिटीशन दाखल केली होती. त्यावर निकाल देताना आज न्यायालयाने सिद्धूंना शिक्षा सुनावली आहे.