Advertisement

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

प्रजापत्र | Thursday, 19/05/2022
बातमी शेअर करा

वडवणी - शेतकरी पित्याने पैसा जवळ नसल्याने इकडून तिकडून जमवा जमव केली. मुलीच चार-पाच दिवसांपूर्वी लग्न लावून दिलं. पहिलंच डोक्यावर कर्जाचा डोंगर त्यात लग्नामुळे वाढ झाली. इतकं कर्ज कसे फेडू या चिंतेतून शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सदरील घटना वडवणी तालुक्यातील देवडी येथे घडली आहे.

 

 

आसाराम दत्तु सांगळे ( वय ४४ वर्ष ) रा. देवडी ( ता. वडवणी ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आसाराम हे स्वतःची जमीन कसून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत, परंतु शेतीची अवस्था काय आहे? हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला होता. त्यात चार-पाच दिवसांपूर्वी मुलीचे लग्न झाले. या लग्नासाठी कर्ज घ्यावं लागलं पण बापाचं कर्तव्य म्हणून ते कार्य पार पाडले. आधीचे व हे कर्ज कसे फेडू, कुटुंबाला कसे सांभाळावे? माझं काहीच खरं नाही? लग्न झाल्यापासून ते म्हणत असल्याचे सांगितले जात आहे. याच चिंतेतून‌ व कर्जबाजारीपणाला कंटाळून मंगळवारी ( दि. १७ ) आसाराम यांनी शेतातील रहात्या घरातच विषारी द्रव्य प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच घरातील व्यक्तींनी तातडीने बीड येथे उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले. येथे उपचारादरम्यान आसाराम सांगळे यांची प्राणज्योत मालवली. ही घटना समजताच गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड जिल्ह्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण पहाता सरण इथलं विझत नाही. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. मयत असराम सांगळे यांच्या पश्चात पत्नी,‌ दोन मुले,दोन मुली, आई, चार भाऊ, भावजया असा मोठा परिवार आहे.
 

Advertisement

Advertisement