Advertisement

मान्सून अंदमानात धडकला

प्रजापत्र | Monday, 16/05/2022
बातमी शेअर करा

बीड-डोळ्यांत प्राण आणून दरवर्षी शेतकरी ज्याची वाट पाहतात, तो मान्सून आज 16 मे रोजी अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. तो केरळमध्ये तो 27 मेपर्यंत पोहोचेल. त्यामुळे पावसासाठी महाराष्ट्र, केरळ, तामिनाडू, अंदमान-निकोबारमध्ये पोषक हवामान तयार होत आहे. या राज्यांमध्ये अनेक भागांत ढगाळ वातावरण आहे. महाराष्ट्रात आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय विदर्भामध्येही ढगाळ वातावरण असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

 

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

आज मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूर तर मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, परभणी व नांदेड या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच या भागांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांत उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

 

गारांच्या पावसाची शक्यता

उत्तरेकडील डोंगरी राज्ये जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत गारांच्या पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात पुढील दोन दिवस धुळीचे वादळ उठण्याची शक्यता आहे. यामुळे तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे.

 

पुढील काही दिवस उष्ण लाटांचाही त्रास

भारतीय हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी मान्सूनच्या परिणामाबाबत सांगितले आहे की, दक्षिण-मध्य कर्नाटकवरील चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे व अरबी समुद्रावरून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे पुढील 5 दिवस तामिळनाडू, कर्नाटक किनारपट्टी, केरळ व महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. याचबरोबर उत्तर व मध्य भारतातील काही भागांत उष्ण लाटांचीही शक्यता असल्याचे ते म्हणाले.

Advertisement

Advertisement