संयुक्त अरब अमीरातचे राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे निधन झाले आहे. यूएईमधील सरकारी वृत्तसंस्था WAM ने याला दुजोरा दिला आहे. राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान 73 वर्षांचे होते आणि ते अनेक दिवसांपासून आजारी होते. राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनानंतर सरकारने 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. याशिवाय, देशातील सर्व खासगी आणि सरकारी क्षेत्रात तीन दिवस सुट्टी असेल. दुबई मीडिया ऑफिसद्वारे राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांनी 3 नोव्हेंबर 2004 पासून देशाचे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे शासक म्हणून पदभार स्वीकारला होता. त्याआधी त्यांचे वडील शेख झायेद बिन सुलतान अल नाहयान राष्ट्रपती होते. 1971 ते नोव्हेंबर 2004 पर्यंत ते देशाचे प्रमुख होते. 1948 मध्ये जन्मलेले शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान हे यूएईचे दुसरे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे 16 वे शासक होते. शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांनी आपल्या कार्यकाळात यूएई आणि अबू धाबीच्या प्रशासनाची पुनर्रचना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि अनेक सुधारणा अंमलात आणल्या. त्यांच्या कार्यकाळातच यूएईचा एवढा विकास झाला की, इतर देशांतील लोकही याठिकाणी मोठ्या संख्येने पोहोचले.
दरम्यान, शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांनी युएईला वायू आणि तेल क्षेत्रात प्रगती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय इतर उद्योगही त्यांच्या कारकीर्दीत विकसित झाले. विशेषतः यूएईच्या उत्तरेकडील प्रदेशांच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, जे इतर भागांच्या तुलनेत किंचित मागासलेले होते. या परिसारात त्यांनी गृहनिर्माण, शिक्षण आणि सामाजिक सेवांचा प्रसार करण्याचे काम केले. त्यांनी यूएईमधील फेडरल नॅशनल कौन्सिलच्या सदस्यांची थेट निवडणूक देखील सुरू केली होती.