Advertisement

बेदम मारहाण करून विवाहितेचा खून!

प्रजापत्र | Thursday, 12/05/2022
बातमी शेअर करा

आष्टी-तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील एका विवाहितेला बेदम मारहाण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. घरातील कुणालाही न सांगता बाहेर गेल्यानंतर पुन्हा घरात परतलेल्या विवाहितेला पती, सासरा आणि दिराने मारहाण केली आणि तिचा मृत्यु झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 

 मनीषा उर्फ सोनाली बाबासाहेब वाघुले (वय २५, रा. शेरी बुद्रुक) असे त्या मयत विवाहितेचे नाव आहे. तिची बहिण अश्विनी राळेभात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मनीषाच लग्न सात वर्षापूर्वी बाबासाहेब अशोक वाघुले याच्यासोबत झाले होते. शनिवारी (दि.०७) दुपारी मनीषा कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली असून ती तुमच्याकडे आली आहे का अशी चौकशी बाबासाहेबने अश्विनी यांच्याकडे केली होती. त्यानंतर बुधवारी (दि.११) दुपारी एक वाजताच्या सुमारास बाबासाहेबने पुन्हा अश्विनीस कॉल केला आणि मनीषा घरी आली असून मी तिला २-३ चापटा मारल्याचे सांगितले. यावेळी मनीषाने फोन हातात घेऊन या लोकांनी मला खूप मारले आहे, आता मारू नका असे त्यांना सांग म्हणाली. त्यामुळे अश्विनीने विनंती केल्यावर बाबासाहेबने मनीषाला आता मारहाण करणार नसल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर बाबासाहेब, त्याचे वडील अशोक नारायण वाघुले आणि भाऊ प्रकाश या तिघांनी मनीषाला कुठल्यातरी वस्तूने मारहाण करून तिचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सदर फिर्यादीवरून बाबासाहेब, अशोक आणि प्रकाश वाघुले या तिघांवर आष्टी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

Advertisement