Advertisement

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२०ची गुणवत्ता यादी जाहीर

प्रजापत्र | Friday, 29/04/2022
बातमी शेअर करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२०चा अंतिम निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. त्यात प्रमोद चौगुले यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला, तर रुपाली माने यांनी महिलांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला. आता ऑप्टिंग आऊटच्या प्रक्रियेनंतर शिफारसपात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. विशेष म्हणजे मुलाखती संपल्यानंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात आला.

 

 

आयोगाकडून डिसेंबर २०१९ मध्ये १५ संवर्गातील २०० पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. एप्रिल २०२०मध्ये परीक्षा घेण्याचे आयोगाचे नियोजन होते. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा चार वेळा पुढे ढकलावी लागली. अखेर मार्च २०२१मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली. पूर्व परीक्षेसाठी २ लाख ६२ हजार ८९१ उमेदवारांनी नोंदणी केली, तर १ लाख ७१ हजार ११६ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. पूर्व परीक्षेचा निकाल सप्टेंबर २०२१मध्ये जाहीर करण्यात आला. ३ हजार २१४ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली. त्यापैकी २ हजार ८६३ उमेदवारांनी डिसेंबर २०२१मध्ये मुख्य परीक्षा दिली. त्यातून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या ६१५ उमेदवारांपैकी ५९७ उमेदवारांनी मुलाखत दिली. त्यानंतर १८ ते २९ एप्रिल दरम्यान मुलाखती घेऊन अंतिम निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

 

 

इतिहासात पहिल्यांदाच…
“करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यसेवा २०२० ची लांबलेली प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यास आयोगाने प्राधान्य दिले. आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यसेवेच्या मुलाखती संपल्यावर तासाभरात निकाल जाहीर करण्यात आला आहे”, अशी प्रतिक्रिया एमपीएससीचे सहसचिव सुनील अवताडे यांनी दिली आहे.
 

Advertisement

Advertisement