Advertisement

भोंग्यांच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारने आज बोलावली सर्वपक्षीय बैठक

प्रजापत्र | Monday, 25/04/2022
बातमी शेअर करा

मुंबई-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये उपस्थित केलेल्या मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील मुद्द्यावर राज्य सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. मात्र आता राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या माहविकास आघाडी सरकारने बोलावलेल्या या बैठकीला राज ठाकरेच उपस्थित राहणार नसल्याचं मनसेचं स्पष्ट केलंय.
मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील विषयावर चर्चा करण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीला राज ठाकरे उपस्थिती राहणार नसल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलंय.
राज्याच्या गृहविभागामार्फत आज भोंग्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्यातील सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलंय. भोंग्यांसदर्भात राजकीय पक्षांच्या भूमिका समजून घेत राज्य सरकारची भूमिका काय आहे हे या बैठकीत मांडलं जाणार आहे. मात्र आता ठाकरे सरकारच्या या बैठकीला ज्या राज ठाकरेंच्या भाषणामुळे हा भोंग्यांचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला ते राज ठाकरेच उपस्थित नसतील हे स्पष्ट झालं आहे.

 

Advertisement

Advertisement