सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी, बीडच्या उल्हास संचेतींनी दाखल केली याचिका
बीडः स्थानिक निवडणूकांच्या संदर्भाने सिमांकन आणि प्रभागरचनेचे निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेण्याचा कायदा राज्य शासनाने मार्च २०२२ केला होता. याला बीड येथील उल्हास संचेती यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर आता सोमवारी (दि. २५ ) न्या.ए एम खानविलकर आणि न्या. अभय ओक यांच्या पिठासमोर सुनावणी होणार आहे. याकडे आता राज्याच्या नजरा लागल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसंंदर्भात प्रभाग रचनेचे अधिकार स्वतःकडे घेण्याचा कायदा राज्य शासनाने ११ मार्च रोजी केला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने सुरु केलेली प्रभाग रचनेची प्रक्रिया निष्प्रभ झाली होती.
राज्य शासनाचा हा कायदा घटनाविरोधी असून यामुळे निवठणूका लांबत असल्याचे सांगत बीड येथील सामाजिक कार्यकर्ते उल्हास संचेती यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. त्यावर आता न्या. ए एम खानविलकर आणि न्या. अभय ओक यांच्या द्विसदस्यीय खंडपिठासमोर सोमवारी (दि. २५ ) सुनावणी होणार असल्याची माहिती उल्हास संचेती यांनी दिली.