Advertisement

भोंग्यांबाबत सर्वांशी चर्चा करूनच निर्णय

प्रजापत्र | Tuesday, 19/04/2022
बातमी शेअर करा

नागपूर-राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची नागपूर येथे पत्रकार परिषद सुरू आहे. पत्रकार परिषदेत महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संघटना, व्यक्तींवर कठोर कारवाई करणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
धार्मिक वादातून महाराष्ट्र अशांत करण्याचा सध्या प्रयत्न केला जात आहे. मात्र, महाराष्ट्रात कुठेही अशांततेचे वातावरण निर्माण होणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत. त्यासाठी पोलिसांनी पुर्ण तयारी केली आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहविभागाने पोलिसांना दिले आहेत. कोणतीही व्यक्ती किंवा संघटनेच्या कृतीमुळे धार्मिक तेढ निर्माण होणार असल्यास अशांवर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

 

भोंग्यांबाबत निर्णय घेण्यापूर्वी परिणाम तपासण्याचे आदेश!
राज्यात भोंग्यावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. याबाबत कालच नाशिक पोलिसांनी नवे निर्देश जारी केले. संपुर्ण राज्यात असा नियम लागू करण्याबाबत विचार सुरू आहे. यासंदर्भात आज पोलिस महासंचालक पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर मी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करेल व नंतर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. या निर्णयामुळे दोन्ही बाजूंवर काय परिणाम होईल, हे तपासण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. येत्या काही दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल, असे वळसे पाटील यांनी सांगितले. तसेच, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत चर्चा झाली. त्यांना राज्यातील स्थितीची माहिती दिली, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

 

भाजपकडून वातावरण तापवण्याचा प्रयत्न!
भाजपकडून देशातील वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरेदर केंद्र सरकारने महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यांवर चर्चा करायला हवी. मात्र, या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठीच भाजपकडून धार्मिक मुद्दे उकरून काढले जात आहे, असा आरोप वळसे पाटील यांनी केला.

 

पत्र दिल्यास राज ठाकरेंनाही सुरक्षा पुरवू!
राज ठाकरे यांना केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज ठाकरेंनी सुरक्षेसाठी राज्य सरकारकडे पत्र पाठवल्यास पुर्ण प्रक्रिया पार पाडून नियमानुसार त्यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला जाईल, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
 

Advertisement

Advertisement