मुंबई : भारतीय हवामान विभागानं (IMD) पावसाचा यावर्षीचा पहिला अंदाज (Monsoon forcast) वर्तवला आहे. यावर्षी चांगला पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर्षी सरासरीच्या 99 टक्के पाऊस बरसणार आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजामुळे बळीराजाला (Farmers in India) दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अनियमित पावसामुळे गेलं वर्षभर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. अवकाळी पाऊस, कधी वाढलेलं तापमान, कधी गारांचा मार, यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. अशातच आता पावसाच्या वर्तवण्यात आलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांऱ्यांच्या जीवात जीव येण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज कितपत खरा ठरतो, याबाबही आता चर्चां रंगवल्या गेल्या, तर नवल वाटायला नको!
स्कायमेटनं वर्तवलेला अंदाज काय होता?
दरम्यान, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून नेहमीप्रमाणेच राहिल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत 880.6 मिमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
दरम्यान, याआधी एप्रिलआधी फेब्रुवारी महिन्यातही स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार पाऊस सामान्यच राहिल, अशीही शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर जारी करण्यात आलेल्या अंदाजातही स्कायमेटनं आपला अंदाज कायम ठेवला आहे.