मुंबई दि.१४ (प्रतिनिधी)-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे व्याक्तित्व आहेत ज्यांचे पुतळे देशाच्या प्रत्येक भागात आढळतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान,राज्य घटना दिली हे आपण जाणतोच, पण ते त्यापलीकडे एक अर्थशात्रज्ञ होते, थोर अभ्यासक होते.त्यांच्या दूरदृष्टीमुळेच देशाला राजकीय व आर्थिक स्थैर्य मिळाले.पाण्यापासून वीजनिर्मिती करण्याची संकल्पना प्रत्यक्षात रुजविण्यात देखील त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांनी केले. तर धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात सामाजिक न्याय विभाग आणखी उंचीवर जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भाक्रा नांगल धरण उभारल्यानंतर पाण्यातून वीज निर्मिती करून ती वीज कुठल्याही भागात पाठवता येऊ शकते, ही संकल्पना बाबासाहेबांच्या प्रेरणा व संकल्पातून सत्यात उतरली, असेही पूढे बोलताना श्री. पवार म्हणाले. राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉ. आंबेडकर आदर्श मानत, आज आपण या महापुरुषांची जयंती साजरी करून त्यांचे स्मरण करतो, पण त्यापुढे जाऊन त्यांचे आचार व विचार आत्मसात करून समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी पुढे आलं पाहिजे, असेही श्री. पवार म्हणाले. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम हाती घेतले, शैक्षणिक, उद्योग, नोकऱ्या आदी क्षेत्रात कालानुरूप सकारात्मक बदल घडवून मुंडेंनी विभागाच्या यशाचा टक्का वाढवत, विभागाला एका उंचीवर नेण्याचे काम करतील असा विश्वासही खा. शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केला.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात भव्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते.उडवली अजित पवार म्हणाले,लंडनमध्ये बाबासाहेबानी वास्तव्य केलेले घर राज्य सरकारने तेथील स्थानिक शासनाकडून विकत घेतले आहे. त्याठिकाणी भव्य संग्रहालय व्हावे, यासाठी निधीची मागणी धनंजय मुंडे व विश्वजित कदम यांनी केली होती, त्यानुसार या कामासाठी १५ कोटी रुपये निधी मंजूर केला असून, यु. के. शासनाशी समन्वय साधून हे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.आजचा कार्यक्रम धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे, आजारपणामुळे त्यांना येता आलं नाही, परंतु विभागाच्या माध्यमातून दुर्बल व उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी सतत सकारात्मक विचार धनंजय करत असतात, त्यांच्याच प्रयत्नातून साकारत असलेले इंदूमिल येथील बाबासाहेबांचे स्मारक राज्य सरकार वेळेत पूर्ण करेल तसेच यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना दिला.