माजलगाव - अवैध सावकारीच्या माध्यमातून जवळपास सव्वा एकर जमीन हडपल्याचे सिद्ध झाल्याने सहकार अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून माजलगाव तालुक्यातील मोगरा येथील दांपत्यावर सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात रोहिदास श्रीराम राठोड (रा. लोणवळ तांडा, ता. वडवणी) यांनी २०१९ साली माजलगाव येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, मोगरा येथील रामदास गोविंद राठोड व जयश्री रामदास राठोड या दांपत्याने अवैध सावकारीच्या व्यवहारातून रोहिदास राठोड यांची निपाणी जवळगाव (ता. माजलगाव) शिवारातील ४७ आर जमीन खरेदीखताच्या आधारे नावावर करून घेतली होती. याबाबत रोहिदास यांनी पुरावे म्हणून सादर केलेल्या कागदपत्रांची सहकार अधिकारी शिवराज दिलीप नेहरकर यांनी तपासणी केली असता तक्रारीत तथ्य असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी राठोड दांपत्याने अवैधरीत्या सावकारी केल्याचेही निदर्शनास आल्यानंतर नेहरकर यांनी माजलगाव ग्रामीण ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून रामदास गोविंद राठोड व जयश्री रामदास राठोड या दोघांवर सावकारी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला.