मुंबई दि.25 – मागच्या कित्येक दिवसांपासून शिक्षक भरतीच्या प्रश्नावर खलबते सुरू आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेकदा खडाजंगी झालेली आहे. परंतु शिक्षक भरती बाबत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याठिकाणी शिक्षक कमी आहेत तिथे शिक्षकभरती केली जाणार असून अतिरिक्त असतील तिथे त्यांचं समायोजन केलं जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यासंदर्भात सभागृहात त्यांनी ही घोषणा केली आहे. याच महिन्याभरात या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये आशा निर्माण झाली आहे.
दरम्यान, अनेक दिवसांपासून हा शिक्षक भरती रखडली असल्याने अनेकवेळा शिक्षकांकडून आंदोलने झाली. संबंधित अनेक संघटनांनी मोर्चे काढले मात्र तरीही राज्यसरकारला जाग येत नसल्याने विरोधकांनी राज्यसरकारला धारेवर धरलं होतं. मात्र आता या घोषणेमुळे शिक्षकांत पुन्हा एकदा उत्साहाते वातावरण पसरले आहे.
 
                                    
                                
                                
                              
