जालना-जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील आष्टीजवळील संकनपुरी येथील ओढ्यात ३ शाळकरी मुलांचा बुडून मृत्यु झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून गुरुवारी (दि.२४) संकनपुरी येथे सायंकाळी चूल पेटली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या अजय रघुनाथ टेकाळे (वय १३), करण बाळासाहेब नाचण (१०) आणि उमेश बाबासाहेब नाचण (वय १०) यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता शाळा सुटल्यावर हे तिघेजण ओढ्यात पोहण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांचे दप्तर ओढ्याच्या काठावर ठेवल्याने त्यांच्या तपास कामात मदत झाली.शाळा सुटल्यावर दोन तास उलटले तरीही मुले घरी आली नाहीत, याची चौकशी करण्यासाठी त्यांच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी कोणीतरी मुलांची दप्तरे ही ओढ्याजवळ असल्याचे सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली शोधाशोध सुरू केली असता बुडालेली मुलं दिसून आल्याने काहींनी पाण्यात उड्या घेतल्या. पण तोपर्यंत मुलांचा मृत्यू झालेला होता.
गावकऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने मुलांचे मृतदेह बाहेर काढले. बुडालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढल्यावर आई- वडिलांसह अन्य नातेवाइकांनी देखील हंबरडा फोडला. त्यांचे दुःख पाहून गावकरी देखील शोकमग्न झाले. या दुर्घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. दुपारी चार वाजेनंतर मृतदेह बाहेर काढल्यावर त्या चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बातमी शेअर करा