नवी दिल्ली दि.२३ – साधारण दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना व्हायरसने (Corona Virus) जगभर धुमाकुळ घातला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता भारतातही अनेक निर्बंध लादण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला तसं कोरोना निर्बंधांमध्ये कमी जास्त प्रमाणात शिथिलता देण्यात आली पण कोरोना निर्बंध मात्र कायम होते.
देशात कोरोना आटोक्यात आला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. देशातील पहिल्या लॉकडाऊनला (Lockdown) दोन वर्षे पूर्ण झाली असून केंद्र सरकारने बुधवारी महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व कोरोना निर्बंध हटवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. कोरोनाचे सर्व निर्बंध हटविण्यात आले असले तरी मास्कचा वापर आणि सहा फुटाचं अंतर हे नियम कायम ठेवण्यात आले आहेत. केंद्र सरकारने सर्व कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, अनेक देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा थैमान घालायला सुरूवात केली आहे. त्यामुळे देशात कोरोनाची चौथी लाट येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात निर्बंध हटवल्याने देशात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.