नवी दिल्ली : यावर्षी आयपीएलमध्ये चाहत्यांना लाइव्ह सामना पाहता येणार की नाही, याची उत्सुकता सर्वांना होती. पण आता आयपीएलची तिकीट विक्री कधीपासून सुरु होणार आहे, याची माहिती समोर आली आहे.
यावर्षी आयपीएलमध्ये एकूण ७० सामने खेळवण्यात येणार आहेत. आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी महाराष्ट्र सरकारने स्टेडियमच्या आसन क्षमतेच्या २५ टक्के परवानगी दिली आहे. आयपीएलच्या पुढच्या काही सामन्यांसाठी २५ ऐवजी ५० टक्केही परवानगी देण्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे. मुंबई क्रिकेट असोसिशेनच्या आशिष शेलार यांनी याबाबतची मागणी केली आहे. त्यानुसार वानखेडे स्टेडियममध्ये ९,८०० ते १०, हजार चाहत्यांना प्रवेश दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये ७ ते ८ हजार चाहत्यांना सामना पाहण्याची संधी मिळू शकते. नवी मुंबईमधील डी. वाय. पाटील स्टेडिममध्ये ११ ते १२ हजार सर्व सामान्य चाहत्यांना प्रवेश दिला जाऊ शकतो, त्याचबरोबर पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियममध्ये १२ हजार चाहत्यांना प्रवेश मिळू शकतो. प्रत्येक स्टेडियमच्या क्षमतेनुसार सामान्य जनतेसाठी तिकिटांची विक्री केली जाऊ शकते. बुधवारपासून आयपीएलच्या सामन्यांची विक्री सुरु होणार आहे, असे बीसीसीआयच्या एका सदस्याने सांगितले आहे. त्यामुळे आजपासून आयपीएलची तिकिट विक्री सुरु झाली आहे. आयपीएलचे साखळी फेरीचे सामने या चार मैदानांमध्ये होणार आहेत. पण बाद फेरीचे सामने मात्र अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवले जाऊ शकतात, असे म्हटले जात आहे. त्यामुळे त्यावेळी गुजरात सरकार याबाबत काय निर्णय घेते, त्यानुसार चाहत्यांना आयपीएलचे सामना पाहता येणार आहे. पण आयपीएलच्या साखळी सामन्यांबाबत मात्र निर्णय आता घेण्यात आला आहे. महाराष्ट्रीतील सामने चाहत्यांना पाहता येणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये ५ ऐवजी ५० टक्केही परवानगी देण्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण त्यासाठी महाराष्ट्रातील सरकार यासाठी कधी निर्णय घेते,याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.