किल्ले धारूर दि.१७ (वार्ताहर) - धारूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागुल यांची बदली नाशिक जिल्ह्यात सटाणा नगरपालिकेत झाल्यानंतर रिक्त असलेल्या पदावर आता परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी (गट ब) म्हणून विशाल साहेबराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
धारूर नगर परिषदेला दोन वर्ष मुख्याधिकारी म्हणून काम करणारे नितीन बागुल यांची बदली नाशिक जिल्ह्यात सटाणा नगरपालिकेत झाली. यानंतर या पदाचा अतिरिक्त पदभार माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे देण्यात आला. दोन महिन्यांपासून नगर परिषदेवर प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी श्रीमती बाफणा काम पाहत आहेत.
राज्याच्या नगर विकास विभागाने दि.१६ मार्च रोजी काढलेल्या आदेशानूसार किल्लेधारूर नगर परिषदेला आता पदाचा मुख्याधिकारी मिळणार आहे. राज्यातील २६ नगर परिषदांसाठी नुकत्याच नगर परिषद संवर्ग कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी गट ब संवर्गातील १० टक्के पदांवर मर्यादित विभागीय परिक्षेद्वारे पदोन्नतीने नियुक्तीची संधी देण्यात आली आहे. यातूनच विशाल पाटील परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी म्हणून किल्ले धारूर नगर परिषदेत नियुक्त करण्यात आले आहेत.
इतर नगर परिषदेत मराठवाड्यातील किल्ले धारूर, नळदुर्ग, तुळजापूर, मुखेड, बिलोली, हिमायतनगर, उमरी, पुर्णा या नगर परिषदांना मुख्याधिकारी मिळणार आहे. सध्या यातील बहुतेक नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणूका होणार असून मुख्याधिकारी मिळाल्यामुळे प्रशासनाचा ताण कमी होणार आहे.