गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे संपूर्ण जगावर संकट कोसळले होते. कोरोना लसीकरण आणि घेण्यात येत असललेल्या खबरदारीमुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत होते. कोरोना महामारीनंतर विस्कळीत झालेले जीवन पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र, यातच एक चिंतेची बातमी समोर आली आहे. इस्त्रायलमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळला आहे. यासंदर्भातील माहिती इस्त्रायल आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत या नव्या व्हिरियंटची दोन जणांना लागण झाली आहे. संबंधित दोन्ही रुग्ण गेल्या बुधवारी इस्त्रायलमध्ये परतले होते. इस्त्रायलमधील बेन गुरियन विमानतळावर झालेल्या कोरोना चाचणीत दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले. या व्हेरियंटचा उगम इस्त्रायलमध्येच झाला असावा, असे आरोग्य मंत्रालयाचे संचालक नाचमॅन एश यांनी म्हटलं आहे. तथापि, यावर सध्या संशोधन सुरू आहे.
BA.1+ BA.2 = नवा कोरोना व्हेरियंट
कोरोनाचा हा नवा व्हेरियंट हा BA.1 हा BA.2 मधून निर्माण झाला आहे. सध्या या नव्या व्हेरियंटला कोणतेही नाव देण्यात आले नाही. जागतिक आरोग्य संघटनेकडून अद्याप यावर कोणतेही विधान करण्यात आले नाहीये.
नवा व्हेरियंट किती धोकादायक?
इस्त्रायल हेल्थ तज्ञांनुसार, या नव्या व्हेरियंटमुळे कोरोनाची लाट येण्याची शक्यता कमी आहे. वेगवेगळ्या व्हेरियंटमधून निर्माण झालेले कॉम्बिनेशन जास्त धोकादायक नसते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलेल्या ओमाक्रॉनचा प्रभाव पाहता ही शक्यता योग्य असल्याचे मानले जातं आहे.
BA.2 मुळे चीनवर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट -
चीनमध्ये BA.2 हा कोरोनाचा उप-प्रकार आढळा असून त्याच्या संसर्गामुळे पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. 'झिरो कोविड पॉलिसी'च्या काटेकोर अंमलबजावणीनंतरही कोरोना अनियंत्रित वेगाने वाढत आहे. याचे कारण 'स्टेल्थ व्हेरियंट' म्हणजेच ओमाक्रॉनचा BA.2 सब-व्हेरियंट असल्याचे मानलं जातं. बुधवारी, चीनमध्ये 1,226 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे अद्याप एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.