भूम : सेवानिवृत्त झाल्यानंतर सुधारीत वेतननिश्चिती बाबत आदेश काढण्यात आले होते. सदर फरक बिलाच्या धनादेशावर वरिष्ठांची सही घेण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना कनिष्ठ सहायक महिलेस लाच घेताना लाच लुचपत विभागाने अटक केली आहे.
लाच लुचपत विभागाने दिलेल्या माहिती नुसार , भूम येथील तक्रारदाराचे वडील हे मैल कामगार म्हणून 2016 सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर 2021 मध्ये त्यांची सुधारीत वेतननिश्चिती बाबत आदेश काढण्यात आले होते. या फरकाचा धनादेश ही तयार करण्यात आला होता. धनादेशावर वरिष्ठांची सही घेण्यासाठी उपविभाग जिल्हा परिषद बांधकाम भूम येथील कनिष्ठ सहायक पदावर कार्यरत असलेल्या राजश्री उत्तमराव शिंदे यांनी तक्रारदाराकडे 1500 रु लाचेची मागणी केली. तक्रादारास लाच देण्याची इच्छा नसल्याने लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. सदर तक्रारी ची खात्री करून सापळा रचला. सदर फरक रक्कम बिलाच्या रु.91257 रुपयांच्या धनादेशावर वरिष्ठांची सही घेण्यासाठी राजश्री शिंदे यांनी तक्रारदार यांचेकडे 1500/- रुपयांच्या लाचेची पंचांसमक्ष मागणी करून पंचासमक्ष स्वीकारल्याने अटक करण्यात आली आहे.
सदरील कार्यवाही साठी डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, श्री.विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक, औरंगाबाद यांनी मार्गदर्शन केले. तर सापळा अधिकारी म्हणून प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक ,लाच लुचपत प्रतिबंध विभाग उस्मानाबाद यांनी काम पाहिले. या पथकात दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, अर्जुन मारकड, विशाल डोके सहभागी होते.
कोणताही शासकिय अधिकारी/कर्मचारी कायदेशीर कामासाठी लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,उस्मानाबाद येथे संपर्क साधण्याचे आवाहन प्रशांत संपते यांनी केले आहे.