मुंबई-देवेंद्र फडणवीसांच्या आरोपानंतर सरकारी वकील प्रविण चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आला असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "प्रत्येक केस ही सीबीआयकडे द्या अशी मागणी करणे हे बरोबर नाही. महाराष्ट्रातील पोलीस दलावर तुमचा विश्वास नाही का? मी कुणाची पाठराखण करणार नाही, परंतु हे संपूर्ण प्रकरण आपल्याला तपासावं लागेल. यामागे कोण आहे, कोण दोषी आहे त्याच्यावर काय कारवाई करायची हे पहावं लागेल."
देवेंद्र फडणवीस यांचे आरोप काय?
राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे.त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा घणाघाती आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात खळबळ उडवून दिली होती. विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असलेल्या व्हिडीओचा पेन ड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. गिरीश महाजनांच्या विरोधात गुन्हा कसा नोंद करायचा यापासून ते बरंच काही या कार्यालयात ठरलं. एफआयआर नोंद करणे आणि खोटे साक्षीदार तयार करण्याचं काम सरकारी वकिलांनी केलं. साक्षी कशा घ्यायच्या त्यापासून पैसे कसे घ्यायचे याचा सर्व घटनाक्रम या व्हिडीओत असल्याचे त्यांनी म्हटले.