वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर चीनमधील शिंझेन या शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन (China Lockdown) करण्यात आला आहे. एकीकडे भारतात कोरोना (India Corona) रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी चीनमध्ये मात्र पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढीनं डोकं वर काढलंय. त्या पार्श्वभूमीवर चीनमधील 170 लाख लोकसंख्या असलेल्या शिंझेन या शहरात पुन्हा लॉकडाऊनसारखा कडक निर्णय घेण्याची वेळ ओढावली आहे. शिंझेनआधी चीनच्या वेगवेगळ्या शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्याची नामुष्की ओढावली आहे. रुग्णसंख्या (Corona Cases) नियंत्रणाबाहेर जात असल्यानं कडक टाळेबंदीशिवाय आता कोणताच पर्याय उपलब्ध नसल्यानं स्थानिक प्रशासनाकडून कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. शुक्रवारी चीनच्या चांगचुन शहर आणि आजुबाजूच्या परिसरात कोरोना रुग्णवाढीचा भडका उडाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा 90 लाख लोकसंख्या असलेल्या चांगचुन शहरात कोरोनामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता.
अनेक शहरांत लॉकडाऊन
आता शिंझेन या 170 लाख लोकसंख्येच्या शहरावरही कोरोनाचं संकट अधिक गडद होऊ लागलंय. त्यामुळे या शहरातली लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसरा चीनमध्ये 397 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यातील 98 रुग्ण एक एकट्या जिलिनमध्ये आढळले होते. चांगचुन शहरात दोन रुग्ण आढळले होते.
दरम्यान, कोरोना महामारीतली ही रुग्णवाढी भारताच्या दृष्टी अतिशय अल्प असली तरिही चीनमधील स्थानिक प्रशासनाचं कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. एकापेक्षा अधिक रुग्ण जिथे सापडतील, तिथं लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला जातो आहे.