पाटोदा-जबरी लुटीचा गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी ४० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी (दि.११) रंगेहात पकडले आहे.
अफरोज तैमूरखाॅ पठाण (वय ३६) असे त्या उपनिरीक्षकांचे नाव आहे. ते पाटोदा ठाण्यात कार्यरत होते. सायंकाळी एसीबीच्या बीड येथील पथकाने त्यांना लाच मागणी केली म्हणून अटक केली. एका तक्रारदारावर जबरी लुटीचा गुन्हा होता, तपासात त्यास सहकार्य करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाचमागणी केली होती. तडजोडीनंतर ४० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. मात्र, संशय आल्याने उपनिरीक्षक पठाण यांनी लाच स्वीकारली नाही. अखेर एसीबीने त्यांना लाचमागणीच्या आरोपाखाली अटक केली. उपअधीक्षक शंकर शिंदे, हवालदार सुरेश सांगळे, हनुमंत गोरे, भरत गारदे, श्रीराम गिराम, गणेश म्हेत्रे, अविनाश गवळी आदींनी ही कारवाई केली.