अंबाजोगाई - तालुक्यात आज (दि.१०) सलग दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील गडदेवाडी शिवारातील रस्त्यालगत हा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या चेहऱ्यावरील जखमा पाहता घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बाबुराव विठ्ठल गडदे (वय ४८, रा. चिचखंडी, ता. अंबाजोगाई) असे मयताचे नाव आहे. बाबुराव बुधवारी (दि.०९) सकाळी ७ वाजता शेताच्या जवळ असलेल्या बाळूमामाच्या मंदिरात जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्यानंतर परतले नव्हते. अखेर आज सायंकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला.
सलग दुसरा खून?
दरम्यान, बुधवारी रात्री अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील साकुड येथे दिपक रामकीशन दगडे या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. त्यानंतर लागलीच गडदेवाडीत मृतदेह आढळून आल्याने वाढलेल्या गुन्हेगारी बाबत नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे.