बीड : येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या वक्फ जमीन गैरव्यवहाराच्या गुन्ह्यातील ५ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तात्पुरता दिलासा दिला आहे. आरोपींच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर निर्णय देताना ८ मार्चपर्यंत त्यांना अटकपूर्व जमीन मंजूर करण्यात आला आहे.
बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वक्फ जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात भूमाफियांसह सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. यातील आरोपींची बीडच्या सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सत्र न्यायालयाने सदर प्रकरण उच्च न्यायालयासमोर न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत त्यांच्या याचिका निकाली काढल्या होत्या. त्यामुळे यातील हबीबोद्दीन सिद्दीकी , रसियोद्दीन सिद्दीकी . सालिमोद्दीन सिद्दकीयांच्यासह महसूल विभागातील कर्मचारी वसंत मंडलिक आणि बप्पासाहेब खोड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. त्यांच्या याचिकांवर न्या. विभा कंकणवाडी यांच्यासमोर सुनावणी झाली. या जामिनाला सर्कारपक्षाकडून विरोध करण्यात आला, मात्र न्यायालयाने वक्फ मालमत्तांचे अनेक गुन्हे अनेक ठिकाणी दाखल झाले आहेत. मुळात ५ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेत आता गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे पर्थदर्शनी आरोपींना अंतरिम दिलासा देणे आवश्यक असल्याचे नोंदवत आरोपींना अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी ८ मार्चला ठेवण्यात आली आहे.