परळी दि.२० (वार्ताहर)-शहरातील अरुणोदय मार्केटमधील व्यापारी प्रवीण मालेवार यांनी स्वतःच्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.१८) सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. सावकारांच्या सततच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची फिर्याद प्रवीण मालेवार यांच्या पत्नी मेघा यांनी दिल्यानंतर रविवारी (दि.२०) १६ सावकारांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
मेघा मालेवार यांनी फिर्यादीत नमूद केले आहे की, २०१३ साली प्रवीण यांनी २५ लाखांना घर खरेदी केले होते. यावेळी त्यांच्यावर खूप सारे कर्ज झाले होते. २०१८ साली घर विकूनही पूर्ण कर्ज फिटले नाही. मुद्दल आणि व्याजासह पैसे देऊनही सावारांनी अधिक रकमेसाठी त्यांच्याकडे तगादा लावल्याने ते तणावात होते. गोपाळ मुंडे, सुभाष मुंडे, पारसेवार, मधुकर साखरे, विष्णु मुंडे, मयुर हरगावकर, शामराव कातकडे, प्रकाश चिद्रवार, संजय मुळे, अघाव मडम, अग्रवाल ग्लास, कृष्णा भांगे, बालाजी मुंडे, बाबर भाई, शिव ओपळे आणि बोकन सोनार यांचे कर्ज फेडूनही ते त्रास देत असल्याबद्दल प्रवीण यांनी हिशोबाची चिट्ठी लिहून गुरुवारी रात्री पत्नी मेघा यांना सांगितले होते. मला खूप वैताग आला आहे, हे लोक मला सोडणार नाहीत असेही प्रवीण म्हणाले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ६ वाजता घरातून बाहेर पडून प्रवीण यांनी दुकानात जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. सदर फिर्यादीवरून परळी शहर ठाण्यात सर्व १६ सावकारांवर प्रवीण मालेवार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला.