Advertisement

पतीला न सांगता माहेरी गेल्याने सासुरवाडीत जावून केला तिचा खून

प्रजापत्र | Sunday, 11/10/2020
बातमी शेअर करा

बीड :  पतीला न सांगता पत्नी परस्पर माहेरी गेली. याचा राग आल्याने संतप्त पतीने सासरवाडीत येऊन पत्नीवर धारदार मोठ्या जंबिया चाकूने सपासप वार करुन तिचा खून केला. ही घटना शनिवारी बीड तालुक्यातील बोरखेडमध्ये घडली.
नगीना शाहजी काळे (वय २५) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. बीड तालुक्यातील बाेरखेड हे नगीना यांचे माहेर आहे तर हंगेवाडी (ता. भूम जि. उस्मानाबाद) हे सासर आहे. काही दिवसांपूर्वी नगीना या पतीला न सांगता माहेरी गेल्या होत्या. याचा राग आल्याने शनिवारी पती शहाजी शहात्तर काळे याने बोरखेड येथे सासरवाडीत येऊन पत्नीला मारहाण केली. यावेळी त्याने मोठ्या जांबीया चाकूने नगीनाच्या चेहऱ्यावर, छातीवर आणि कानावर सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन नगीनाचा जागीच मृत्यू झाला. सासरवाडीच्या लोकांसमोरच शहाजी काळेेने पत्नीला संपवले. 
या प्रकरणी नगीना यांच्या आई राणी बाबूशा पवार यांनी नेकनूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन शहाजी शहात्तर काळे विरोधात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे हे करत आहेत.  

 खूनी पतीला उस्मानाबाद जिल्ह्यात ठोकल्या बेड्या  

दरम्यान, खून केल्यानंतर शहाजी काळे हा फरार झाला होता. पोलिसांना माहिती देऊ नये म्हणून त्याने सासरवाडीच्या लोकांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, खूनाचा गुन्हा नोंद झाल्यानंतर नेकनूर पोलिसांनी रविवारी शहाजी काळे याला उस्मानाबाद जिल्ह्यातून अटक केली असल्याची माहिती नेकनूर ठाण्याचे एपीआय लक्ष्मण केंद्रे यांनी दिली. साेमवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement