Advertisement

प्रेम समजून घेताना

प्रजापत्र | Monday, 14/02/2022
बातमी शेअर करा

मागच्या काही वर्षात प्रेमभंगातून आत्महत्या करण्याचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर वाढले आहे. प्रेम म्हणजे जिथे जगण्याची, नाविन्याची उर्मी होती , तिथे आता प्रेमातूनच लोक जीवन संपविणार असतील तर प्रेमाची खरी परिभाषा समजून घेण्याची आवश्यकता आहे. प्रेम ही संकल्पना फार उदात्त आहे, केवळ थिल्लरपणात संपविण्याची ही गोष्ट नाही आणि प्रेम म्हणजे काही तरी सामान्यांसाठी त्याज्य असेही काही नाही. व्हॅलेंटाईन म्हणजे ज्याच्याजवळ सारं काही मोकळेपणाने बोलता येईल अशी व्यक्ती, अशा व्यक्ती जर प्रत्येकाच्या आयुष्यात असतील तर साहजिकच आत्महत्यांच्या आजारावर देखील हे प्रभावी औषध ठरेल.

 

 

 

व्हॅलेंटाईन डे ला विरोध किंवा व्हॅलेंटाईन डे साजरा करणारांना शोधून त्यांना धमकावण्याच्या प्रकारांना आता फारसा प्रतिसाद मिळत नाही. काही वर्षांपूर्वी कथित संस्कृती रक्षकांची जी दंडेली व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने चालायची, आता त्याला सामाजिक पाठिंबा ओसरत चालला आहे. नाही म्हणायला अजूनही काही ठिकाणी कथित संस्कृती रक्षक अधूनमधून आम्ही व्हॅलेंटाईन डे होऊ देणार नाही असली ओरड करीत असतात, मात्र ती संख्या बोटावर मोजण्याइतकी किंवा दुर्लक्ष करण्यासारखीच आहे, आणि असेही त्यांच्या या घोषणांमागे संस्कृतीच्या प्रेमापेक्षा राजकारणाचा भाग अधिक असतो. त्यामुळेही त्यांची फारशी दखल घेण्याची आवश्यकता नाही. आता व्हॅलेंटाईन डे एक सर्वमान्य उत्सव झाला आहे इतके नक्की, त्यामुळेच या उत्सवाकडे आजच्या परिस्थितीत कसे पाहू शकतो आणि यातून समाजाच्या दृष्टीने काय चांगले निर्माण करू शकतो याचा विचार होणे आवश्यक आहे.

 

 

मागच्या काही वर्षात साऱ्याच समाजाला आत्महत्यांच्या आजाराने ग्रासले आहे. अगदी कोरोनाच्या महामारीत देखील आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. आपल्या मनातील घुसमट कोणाजवळ व्यक्त करता येत नाही, आणि त्यातून मृत्युला जवळ करणे चांगले वाटते, अशी एक मानसिकता समाजात वाढीस लागली आहे, आणि हे एकंदरीतच समाज स्वास्थ्यासाठी घातक आहे. यामागे अर्थातच कुटुंबातील, समाजातील कमी होत चाललेला संवाद आणि आटत चाललेले प्रेम हे महत्वाचे कारण आहे. ज्यांना प्रेम म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण किंवा शृंगार वाटतो, त्यांना हे कळणार नाही, मात्र व्हॅलेन्टाईनच्या निमित्ताने प्रेमाची मूळ भावना आपण समाजात रुजवू शकतो का यादृष्टीने विचार करण्याची वेळ आज निश्चितच आली आहे.

 

 

 

प्रेम म्हणजे केवळ आकर्षण, किंवा एकमेकांच्या मिठीत, डोळ्यात हरवून जाणे नसते , तर प्रेम म्हणजे खऱ्या अर्थाने जपणूक , आधार, काळजी , विश्वास अशा अनेक रंगांचे इंद्रधनुष्य असते. म्हणूनच ज्याला कोणाला आपण व्हॅलेंटाईन म्हणतो, त्याला बोलते करणे , त्याच्या मनात डोकावणे आणि त्याच्या केवळ स्वप्नांनाच नव्हे तर त्याच्या मानसिकतेला खंबीर करणे हे जरी साधता आले तरी अनेक प्रश्न सहज सुटतील .

राहता राहिला प्रश्न प्रेमातून म्हणा, एकतर्फी प्रेमातून म्हणा, किंवा प्रेमभंग किंवा अपेक्षाभंगातून होणाऱ्या नैराश्याचा , आत्महत्यांचा, एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या गुन्ह्यांचा, महिलांवरच्या अत्याचारांचा, तर येथेही प्रेम म्हणजे नेमके काय हे नीट समजून सांगण्याची आवश्यकता आहे. शाळांमधून आपण नैतिक मूल्यांचा वसा घेतो, परिपाठात त्याचा समावेश करतो, पण हे सारे केवळ घोकंपट्टीच्या पलीकडे जात नाही, अशावेळी जगण्यातल्या प्रत्येक मूल्याचा अर्थ समजून सांगणारी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे, आणि प्रेम हे मानवी जीवनातील एक आदिम, शाश्वत आणि चिरंतन मूल्य आहे हे समाजावर रुजविण्याची आवश्यकता आहे. आज ती गरज प्रकर्षाने जाणवत आहे. प्रेम केवळ भेटवस्तूपुरते, एका दिवसाच्या डेटिंग पुरते नसते, किंवा आठवडाभराच्या वेगवेगळ्या 'डे' च्या सेलिब्रेशनपुरतेही नसते, हे तर आवश्यक असतेच, कारण त्यामुळे भावनांमध्ये एक प्रकारचा जिवंतपणा येतो, पण यापलीकडे जाऊन एकमेकांना समजून घेणे, आपल्या मनातलं समोरच्याला मोकळं बोलता येईल इतका विश्वास निर्माण करणे, आणि जबरदस्ती नव्हे तर समर्पण ही भावना रुजविणे आणि त्याहीपलीकडे जाऊन प्रेमाच्या धाग्याचा आधार वाटावा, तो काचू नये यासाठी प्रत्येकाने स्वतःलाच तसे घडविणे अशा प्रेमाच्या वेगवेगळ्या अंगांची ओळख या निमित्ताने करून देण्याची आवश्यकता आहे.

 

 

 

ज्यावेळी कोणत्याही गोष्टीची एक संस्कृती तयार होत असते, किंवा एखादी गोष्ट, एखादा उत्सव जगण्याचा भाग होत असतो, त्यावेळी त्या उत्सवाला कोरडा विरोध करून किंवा आंधळेपणाने डोक्यावर घेण्यात अर्थ नसतो, तर हा आपल्या जीवनाचा भाग आहे हे लक्षात ठेवून त्या उत्सवाचे नवे आयाम, नवे अर्थ शोधावे लागतात, त्या उत्सवांना नवे अर्थ द्यावे लागतात . आज व्हॅलेन्टाईनच्या बाबतीत, प्रेमाच्या बाबतीत ते करण्याची कधी नव्हे एवढी आवश्यकता निर्माण झाली आहे. नात्यांमधील ओलावा संपत चाललेला असताना आणि त्यातून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत असतानाच्या काळात आपण 'प्रेम' या भावनेला जगण्याचा भाग बनवून, या उत्सवाला वेगळा अर्थ देऊन शुष्क होत चाललेले नातेसंबंध पुन्हा ताजेतवाने करु शकतो आणि अनेक गोष्टी थांबवू शकतो.

Advertisement

Advertisement