आता असे नवीन एक्स-रे तंत्रज्ञान आले आहे, ज्यामुळे आरटी-पीसीआर चाचणी न करताच एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे कळेल. आतापर्यंत, एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोना संसर्ग शोधण्यासाठी रॅपिड अँटीजेन किंवा RT-PCR चाचणी वापरली जाते. ज्या देशांमध्ये RT-PCR चाचणीचा अभाव आहे, त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान गेम चेंजर ठरू शकते.जाणून घ्या, कोरोनाची तपासणी करण्यासाठी नवीन एक्स-रे तंत्रज्ञान काय आहे? हे तंत्रज्ञान कसे कार्य करते? हे तंत्रज्ञान RT-PCR ची जागा घेऊ शकते का?
एक्स-रेद्वारे कोरोनाची तपासणी होईल
कोरोनाची तपासणी करण्यासाठी हे नवीन एक्स-रे तंत्र वेस्ट स्कॉटलंड विद्यापीठाचे (UWS) शास्त्रज्ञ प्रोफेसर नईम रमझान, गॅब्रिएल ओकोलो आणि डॉ स्टामोस कॅटसिगियानिस यांनी विकसित केले आहे. स्कॉटलंडच्या संशोधकांनी विकसित केलेले हे एक्स-रे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर आधारित आहे. या तंत्रामुळे एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आहे की नाही, हे काही मिनिटांत कळेल.
नवीन एक्स-रे तंत्रज्ञान कसे कार्य करते?
UWS संशोधकांच्या मते, या नवीन तंत्रज्ञानामध्ये कोरोनाबाधित रुग्ण, निरोगी व्यक्ती आणि व्हायरल न्यूमोनियाने ग्रस्त लोकांच्या सुमारे 3,000 एक्स-रे इमेजचा डेटाबेस असतो. AI-आधारित एक्स-रेने या सर्व इमेजच्या स्कॅनची तुलना केली जाते.त्यानंतर, 'डीप कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क' नावाचे AI तंत्रज्ञान अल्गोरिदमद्वारे व्हिज्युअल इमेजरीचे विश्लेषण करते की, त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही. संशोधकांचा दावा आहे की एका विस्तृत चाचणी टप्प्यात, या तंत्राने कोरोना संसर्ग शोधण्यात 98% अचूक परिणाम दिले.
एक्स-रे कोरोना चाचणीचे अनेक फायदे
हे नवीन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या तीन व्यक्तींच्या टीमचे प्रमुख असलेले प्राध्यापक रमजान म्हणतात की, ज्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यासाठी टेस्ट उपकरणे उपलब्ध नाहीत त्यांच्यासाठी हे तंत्र खूप फायदेशीर ठरेल.
AI आधारित एक्स-रे तंत्रज्ञान काही मिनिटांत कोरोना ओळखेल, तर सध्याचा RT-PCR चाचणी अहवाल येण्यासाठी किमान 2 तासांचा कालावधी लागतो. कोरोनाचे लवकर निदान झाल्यास रुग्णांवर उपचार होण्यास मदत होईल.
प्रोफेसर रमजान म्हणाले की, हे तंत्र कोरोना शोधण्यात पीसीआर चाचणीपेक्षा अधिक वेगाने काम करते. ते म्हणाले की, विशेषत: ओमायक्रॉनचा उद्रेक झाल्यानंतर कोरोना लवकर ओळखण्यासाठी जलद आणि विश्वासार्ह साधनाची दीर्घकाळ आवश्यकता होती.
तसेच प्रोफेसर रमजान म्हणाले की, विषाणूच्या गंभीर प्रकरणांची तपासणी करताना, हे तंत्रज्ञान महत्त्वाचे आणि जीवन वाचवणारे सिद्ध होऊ शकते, ज्यामुळे कोणत्या प्रकारच्या उपचारांची आवश्यकता आहे हे लवकरच ठरविण्यात मदत होईल.
टेस्टिंगअभावी त्रस्त असलेल्या देशांना फायदा होईल
नवीन AI आधारित एक्स-रे तंत्रज्ञानाचा विशेषत: RT-PCR चाचण्या पुरेशा संख्येने उपलब्ध नसलेल्या देशांना फायदा होईल. कारण देशातील प्रत्येक व्यक्तीची चाचणी करण्यासाठी सरकारकडे संसाधने नाहीत.
केवळ भारतच नाही तर अमेरिकेने देखील अलीकडेच होम आयसोलेशन कालावधीच्या समाप्तीसाठी अनिवार्य चाचणी रद्द केली आहे. अमेरिकेच्या या निर्णयाला अनेक तज्ञांनी तेथे चाचणीच्या पुरेशा उपलब्धतेच्या अभावाशी जोडून पाहिले. अशा परिस्थितीत, AI आधारित एक्स-रे तंत्रज्ञान केवळ भारत, अमेरिकाच नाही तर जगातील अनेक आफ्रिकन आणि गरीब देशांमध्ये कोरोना तपासणीसाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
आरटी-पीसीआर चाचणीची जागा एक्स-रे तंत्रज्ञान घेईल का?
हे तंत्र विकसित करणारे प्रोफेसर रमजान म्हणाले की, हे तंत्र विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. तथापि, त्यांनी कबूल केले की एक्स-रे तंत्र RT-PCR चाचणीची पूर्णपणे जागा घेऊ शकत नाही कारण संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाची लक्षणे एक्स-रेमध्ये दिसत नाहीत.
सध्या कोरोना टेस्ट कोणत्यापद्धतीने केली जाते?
सध्या, कोरोना संसर्ग ओळखण्यासाठी दोन चाचण्या उपलब्ध आहेत - RT-PCR आणि रॅपिड अँटीजेन चाचणी.
RT-PCR चाचणीमध्ये विषाणूची अनुवांशिक सामग्री ओळखली जाते. सध्या ही चाचणी कोरोना संसर्ग पकडण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. RT-PCR चाचणीचा निकाल येण्यासाठी 2-3 तास लागतात.
रॅपिड अँटीजेन चाचणी विषाणूच्या पृष्ठभागावरील प्रोटीन ओळखून संसर्ग ओळखते. अँटीजेन चाचणीचा निकाल येण्यासाठी 15-30 मिनिटे लागतात.
अँटीजेन चाचणीचा रिझल्ट फार अचूक मानला जात नाही. ही चाचणी कधीकधी पॉझिटिव्ह व्यक्तीला निगेटिव्ह देखील असल्याचे सांगते.
RT-PCR आणि अँटीजेन दोन्ही चाचण्या फक्त हे सांगतात की व्यक्ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहे की नाही. या चाचण्यांमध्ये कोरोना व्हेरिएंट सापडत नाहीत. व्हेरिएंट ओळखण्यासाठी जीनोम सिक्वेसिंग हा प्रकार एकमेव मार्ग आहे.
23 जानेवारी 2022 पर्यंत देशात 71.55 कोटी कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. या सर्व RT-PCR आणि अँटीजेन चाचणी आहेत.
AI आधारित तंत्रज्ञानाने कोरोना तपासणीची घोषणा भारतातही झाली होतीमे 2021 मध्ये, देशात कोरोना चाचणीसाठी AI आधारित तंत्रज्ञान विकसित करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने ATMAN AI नावाचे अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर विकसित करण्याची घोषणा केली होती, जे छातीच्या एक्स-रेद्वारे कोरोनाचे परीक्षण करण्यासाठी AI आधारित तंत्रज्ञान आहे.
चाचणी दरम्यान ATMAN AI 96.73% अचूक असल्याचे आढळले. यामुळे देशात कोरोनाचा वेगवान तपास होण्यास मदत होईल, असे डीआरडीओने म्हटले होते. तथापि, या तंत्रज्ञानाच्या आगमनानंतरही, देश अजूनही कोरोना चाचणीसाठी मुख्यतः RT-PCR आणि अँटीजेन चाचणीवर अवलंबून आहे.
हे सॉफ्टवेअर DRDO च्या सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स (CAIR) द्वारे विकसित केले गेले होते, तर एचसीची सेंटर फॉर अॅकॅडेमिक्स अँड रिसर्च, बंगळुरू आणि Ankh लाइफ केअर, बंगळुरू येथील डॉक्टरांनी त्याची चाचणी आणि प्रमाणीकरण केले होते.