पुणे : कोरोना संकटाच्या काळात आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. त्यामुळे तयारी करणारे विद्यार्थी नैराश्यात जात आहेत. यातून आत्महत्येसारख्या घटना घडत आहेत. अशीच घटना नुकतीच पुण्यात घडली आहे. पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली आहे. अमर मोहिते असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे.
अमर मोहिते हा पुण्यातील सदाशिव पेठेत राहत होता. मागील 2 वर्षापासून तो PSI ची तयारी करत होता. शारीरिक क्षमता चाचणीत केवळ एक गुण कमी पडल्याने त्याची संधी हुकली होती, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे. काल मित्रांना भेटला त्यावेळी तो निराश वाटला. त्यातूनच आज त्याने रूमवर आत्महत्या केली. मराठा आरक्षण टिकलं असतं तर त्याची संधी हुकली नसती असं बोललं जात आहे.
आत्महत्या, कायमच्या समस्येवरचा तात्पुरता उपाय
या घटनेनंतर सध्या त्याच्या नातेवाईकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. जीवनात यश-अपयश येत असतं. पण, त्यानं खचून जात कामा नये. कोरोनासारख्या संकटकाळात अनेकांना समस्यांचा सामना करावा लागला. पण, अशावेळी संयम न ढळता अनेकांनी यातून सावरत पुढे जाण्याचा यशस्वी प्रयत्न देखील केला. पण, अमरने असं का केलं? हाच प्रश्न अनेकांना पडला आहे. समस्या या कायम असतात. पण, त्यावर उपाय देखील आहेत. त्यामुळे अमरने उचललेल्या या टोकाच्या पावलानंतर आत्महत्या ही कायमच्या समस्येवरचा तात्पुरता उपाय आहे अशीच प्रतिक्रिया सध्या अमरच्या आत्महत्येनंतर प्रत्येक जण देताना दिसत आहे.