ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या ४० हजारावर गेल्यास करावा लागेल महाराष्ट्र लॉक
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कालपासून राज्य सरकारने राज्यात प्रतिबंधात्मक आदेश लावायला सुरुवात केली आहे. त्याबरोबरच राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली माहिती दिलासादायक आहे. राज्यात कोरोना रुग्णांसाठी जैवेळी ८०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल, त्यावेळी महाराष्ट्र लॉक करावा लागेल असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. आजपर्यंतचा सर्वात विदारक अनुभव लक्षात घेता ८०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर हा ४० हजार रुग्णांसाठी होतो, त्यामुळे ज्यावेळी राज्यात ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या ४० हजाराच्या पुढे जाईल त्यावेळी लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होणार आहे. आजघडीला राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ८ हजार इतकी आहे. मात्र तरीही लोकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळणे आवश्यक आहे.
ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या निर्देशानंतर राज्य सरकारने राज्यात रात्रीची जमावबंदी लावली आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांच्या उपस्थितीवर देखील बंधने आणली आहेत. त्यामुळे आता राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. लॉकडाउनच्या भीतीने सामान्य नागरिक आणि व्यापारी धास्तावले आहेत .
मात्र आता यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेली घोषणा राज्यासाठी दिलासादायक ठरणारी आहे. टोपे यांनी लॉकडाऊन कोणत्या परिस्थितीत लावला जाईल यासाठी ऑक्सिजनच्या वापराचे सूत्र ठेवले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार राज्यात ऑक्सिजनचा वापर ८उ मेट्रिक टन इतका झाल्यास लॉकडाऊन लावावा लागणार आहे. हेच सूत्र आपण रुग्णसंख्येच्या स्वरूपात पाहू गेल्यास, दुसरी लाट जी सर्वाधिक भयंकर होती, आणि त्यात ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणावर लागली होती, त्या लाटेतील सरासरी पहिली तर साधारण ५० ते ५५ रुग्ण ऑक्सिजनवर असतील तर १ मेट्रिक टन ऑक्सिजन लागत होता , विशेष म्हणजे त्यावेळी बहुतांश रुग्ण हायफ्लो ऑक्सिजनवरचे होते. तीच परिस्थिती गृहीत धरली तर ८०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर म्हणजे ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या ४० हजाराच्या घरात जाणे असा आहे . त्यामुळे महाराष्ट्रात सध्या तरी अशी परिस्थिती निर्माण होण्यासतरखे चित्र नाही.
आजघडीला राज्यात कोरोनाचे ८००० सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २० % गंभीर आहेत आणि त्यांना ऑक्सिनची आवश्यकता आहे असे गृहीत धरले तरी ती संख्या १६०० इतकी होते . त्यामुळे नागरिकांनी आताच लॉकडाउनच्या नावाने घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. सध्या तरी राज्यात लॉकडाऊन लागण्याची कसलीच शक्यता नाही. फक्त लोकांनी देखील प्रतिबंधात्मक उपाययोजना, गर्दी टाळणे आणि मास्कचा वापर याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
राज्यातील आजची रुग्ण संख्या : ८०००
गंभीर रुग्णांची टक्केवारी : २० %
ऑक्सिजनची आवश्यकता असणारे अंदाजे रुग्ण : १६००