Advertisement

आणखी 7 जणांना ओमायक्रॉनची लागण

प्रजापत्र | Sunday, 05/12/2021
बातमी शेअर करा

मुंबई दि.५ (प्रतिनिधी)-राज्यात सात नवीन ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील ओमायक्रॉन पॉझिटव्ह रूग्णांची एकूण संख्या ८ झाली आहे.रविवारी (दि.५) आढळलेल्या सात रुग्णांमध्ये पिंपरमध्ये सहा तर पुण्यातील एक रूग्णाचा समावेश आहे. त्यामुळे डोंबिवली पाठोपाठ आता पुणे व पिंपरीत देखील ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला आहे.
२४ नोव्हेंबर २०२१ रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेली ४४ वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुला आणि पिंपरी-चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकूण सहा जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणून सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रविवारी (दि.५) संध्याकाळी दिला आहे. तसेच, पुणे शहरातील ४७ वर्षीय पुरूषाला देखील या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरटरीच्या अहवालाने सिद्ध झाले आहे.या सहा जणांपैकी तीन जण नायजेरियाहून आले आहेत, तर इतर तिघे त्यांचे निकटसहावासित आहेत. नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची ४४ वर्षांची महिला तिच्या १२ आणि १८ वर्षांच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी २४ नोव्हेंबर २०२१ रोजी पिंपरी-चिंचवड येथे आली. त्या तिघींनी ओमायक्रॉन विषाणूची बाधा असल्याचे आता सिद्ध झाले आहे.
या तिघींच्या १३ निकटसहवासितांची तपासणी करण्यात आली असून, त्याततील या महिलेचा ४५ वर्षांचा भाऊ आणि त्याच्या अनुक्रमे दीड वर्ष आणि सात वर्षांच्या दोन मुली या कोविडबाधित आल्या आहेत. या तिन्ही निकटसहवासितांमध्ये देखील ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे.

 

लक्षणे अत्यंत सौम्य
नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर पाच जणांना कसलीही लक्षणे नाहीत. या सहा जणांपैकी तिघे हे १८ वर्षाखालील असल्याने त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही. उर्वरित तिघांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. दोघांनी कोविशिल्ड तर एकाने कोवॅक्सिन ही लस घेतलेली आहे. हे सर्व रूग्ण सध्या पिंपरी येथील जिजामाता रूग्णालयात भरती असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

Advertisement

Advertisement