एस. टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या कर्मचार्यांच्या संपाला हिंसक वळण लागले आहे. संप काळात आतापर्यंत 50 पेक्षा जास्त गुन्हे एस. टी. प्रशासनाने नोंदविले आहेत. यात 32 गुन्हे एस.टी. बसवर दगडफेक केल्याप्रकरणी आहेत.
शनिवारी एका दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी 13 बसवर दगडफेक झाली. यापैकी एका दगडफेकीतील संशयित हा चक्क महामंडळाचा वाहकच असून त्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडला. शनिवारी राज्यात विविध ठिकाणी 13 बसवर दगडफेक झाली. यात चालक, वाहकही जखमी झाले. दगडफेक करणार्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात महामंडळाच्या वतीने स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, महामंडळाने निलंबनाची कारवाईही अधिक तीव्र केली असून रविवारपर्यंत 6 हजार 497 कर्मचारी निलंबित केले आहेत. रोजंदारीवरील एक हजार 525 जणांची सेवासमाप्त केली आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस असूनदेखील महामंडळाने कारवाई सुरूच ठेवली. रविवारी कायमस्वरूपी कर्मचार्यांपैकी 93 जणांना निलंबित केले.