Advertisement

रस्त्यावर सापडलेली बॅग आणि पैसे केले परत

प्रजापत्र | Saturday, 27/11/2021
बातमी शेअर करा

परळी - जगात प्रामाणिक माणसे कमी आहेत असं आजकाल म्हटल्या जातंय. चोरी, लबाडी, फसवणूक करणाऱ्या आजच्या काळात अनेक प्रामाणिक आणि सहृदयी माणसेही आहेत. याचे मूर्तिमंत उदाहरण शनिवारी परळीत घडलेल्या घटनेवरून लक्षात येईल. प्रवाश्याची पैसे असलेली बॅग परळी ते अंबाजोगाई ऑटो प्रवासादरम्यान गहाळ झाली होती. सदरील बॅग रस्त्यावर पडलेली एका हॉटेल मालकाने पाहिले आणि त्याने ती प्रामाणिकपणे पोलिसांच्या हवाली करत ज्यांची होती त्यांना परत केली. या प्रमाणिकपणाबद्दल विशाल हॉटेलचे संचालक दत्ता लहूदास मुंडे यांचा प्रमाणिकपणाबद्दल सत्कार करण्यात आला.

 

झाले असे की, अंबाजोगाई येथील रहिवासी शेख सादेक हे परळीहून अंबाजोगाईला जाण्यासाठी रिक्षात बसले होते. हातातील पैसे असलेली बॅग त्यांनी रिक्षाच्या मागच्या बाजूस सीटच्या वर ठेवली होती. रिक्षाला मागच्या बाजूस छिद्र असल्याने ती बॅग रस्त्यात नेमकी कुठे पडली हे शेख सादेक यांच्या लक्षात आले नाही. अंबाजोगाई येथे पोचल्यानंतर रिक्षातून उतरत असतांना आपली बॅग नसल्याचं लक्षात आलं. दुसरीकडे परळी ते अंबाजोगाई रोडवर कण्हेरवाडी येथील विशाल हॉटेलचे मालक दत्ता लहूदास मुंडे यांना हॉटेलसमोर मुख्य रस्त्यावर बॅग पडलेली आढळून आली. बॅग उघडून न पाहता त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात आणून दिली. बॅगमधील महत्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम 65 हजार रुपये शेख सादेक यांना परत देण्यात आली. हॉटेलमलकाच्या प्रमाणिकपणाबद्दल शहर पोलीस ठाण्यात सत्कार करण्यात आला. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, संभाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, डीबीचे प्रमुख भास्कर केंद्रे, निर्मळ तात्या, शंकर बुडडे, तुकाराम मुरकुटे, सुंदर केंद्रे यांच्यासह पोलीस आणि पत्रकार उपस्थित होते.

Advertisement

Advertisement