Advertisement

 'राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील

प्रजापत्र | Saturday, 18/05/2024
बातमी शेअर करा

 मुंबईः इंडिया आघाडीच्या वतीने मुंबईत पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या पत्रकार परिषदेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.

 

 

यावेळी बोलताना खर्गे म्हणाले की, पंतप्रधानांच्या अनेक सभा आणि रोड शो होत आहे. ते जिथे जातात तिथे समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न करतात. चुकीचा विचार लोकांसमोर मोडून नागरिकांना भडकावण्याचं काम करत आहेत. मी ५३ वर्षांपासून राजकारणात आहे. परंतु अशा पद्धतीचं राजकारण यापूर्वी कधीच बघितलं नव्हतं.''विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकी देणं, प्रादेशिक पक्ष हिसकावून घेणं, असं प्रकार सुरु आहे. सगळ्या यंत्रणांना हाताशी धरुन भाजप कुरापती करत आहे. परंतु आता लोकांनीच ही निवडून हातात घेतली असून त्यांची नाराजी मतपेटीतून पुढे येणार आहे.''

 

 

खर्गे पुढे म्हणाले की, मुंबईमध्ये मागच्या दोन वर्षांपासून महानगर पालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, असं राजकारण सर्वत्र केलं जातंय. अनेक राज्यांमध्ये मोडतोड करुन सत्ता मिळवण्यात भाजपला यश मिळत आहे. परंतु या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठं यश मिळणार आहे. राज्यातल्या ४८ जागांपैकी महाविकास आगाडीला कमीत कमी ४६ जागा मिळतील, असा मला विश्वास आहे.

''मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथेच आरबीआयचं कार्यालय आहे. परंतु जेव्हापासून मोदीजी आले आहेत तेव्हापासून या शहराला खाली खेचण्याचं काम त्यांनी केलं. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही जीएसटीमध्ये बदल करणार असून साधा सरळ टॅक्स लावणार आहोत.''

शेवटी खर्गे म्हणाले की, देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर महिलांसाठी महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून वर्षाला एक लाख रुपये दिले जातील, हा आमचा शब्द आहे. अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून पाच किलोच्या ऐवजी दहा किलो धान्य आम्ही देणार आहोत. ही योजनाच आम्ही आणली असून मोदीजींनी हे मान्य केलं पाहिजे.

Advertisement

Advertisement