Advertisement

 आमचं सरकार सत्तेत आल्यावर 'त्या' पोलिसांवर कारवाई करणार

प्रजापत्र | Saturday, 18/05/2024
बातमी शेअर करा

मुंबईतील लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसं राजकीय वातावरण चांगलंच तापत आहे. शुक्रवारी मुलुंड येथे भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. भाजपकडून मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला.

 

 

यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या ५ कार्यकर्त्यांना अटक देखील केली आहे. मात्र, पोलीस हे सुडबुद्धीने आमच्यावर कारवाई करत असल्याचं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.पोलिसांकडून आपल्याला मारहाण झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही त्या पोलिसांना बघून घेऊ, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. विक्रोळी येथील जाहीर सभेतून ठाकरेंना हा इशारा दिला आहे. याशिवाय ठाकरेंनी शिवसैनिकांना शांत राहण्याचं आव्हान केलं आहे.

 

 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
विक्रोळीतील जाहीर सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, "काल मुलंडमध्ये आपल्या शिवसैनिकांनी जी धाड टाकली. त्याच्यामध्ये पोलिसांनी आपल्याच महिलांना आणि कार्यकर्त्यांना पकडलं. इतकंच नाही, तर त्यांनी शिवसैनिकांना बेदम मारहाण केली. माझी शिवसैनिकांना विनंती आहे, की मला त्या पोलिसांची नावे द्या. आपलं सरकार आल्यावर मी त्यांना बघतोच", असं ठाकरेंनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "मला पोलिसांनाही सांगायचं आहे की तुम्ही भाजप किंवा फडणवीसांचे नोकर नाही आहात. तुम्ही जनतेचे सेवक आहात. उद्या आमचं सरकार सत्तेत आल्यावर तुमचं काय करायचं तो निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही. हा पोलिसांना मी जाहीर इशारा देतोय", असंही ठाकरे म्हणाले.

Advertisement

Advertisement