आयपीएल २०२४ च्या हंगामात इम्पॅक्ट प्लेअर नियमाची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने यापूर्वीच या नियमावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बीसीसीआयने देखील यावर पुन्हा विचार करणार असल्याचं सांगितलं. आता आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने देखील या वादात उडी घेतली आहे.
विराट कोहली म्हणाला की, 'मी याबाबतीत रोहित शर्माचं समर्थन करतो. मनोरंजन हा खेळाचा एक भाग आहे मात्र त्यात समतोल असला पाहिजे. इम्पॅक्ट प्लेअरमुळं समतोल बिघडला आहे. हे असं अनेक लोकांना वाटतं ते फक्त मला वाटत नाही.' काही दिवसांपूर्वी रोहित शर्माने देखील पॉडकास्टमध्ये इम्पॅक्ट प्लेअर नियमाला विरोध केला होता. यामुळे अष्टपैलू खेळाडूंवर परिणाम होत आहे.
विराटने गोलंदाजांबद्दल व्यक्त केली सहानुभूती
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आतापर्यंत तब्बल आठवेळी २५० पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. विराट कोहली म्हणाला की, 'गोलंदाजांना काय करावं तेच कळत नाहीये. गोलंदाजाला वाटतं की त्याच्या प्रत्येक चेंडूवर चौकार किंवा षटकार लागणार आहे. मला असं कधी पाहिलं नव्हतं. प्रत्येक संघाकडे बुमराह किंवा राशिद खान नसतात.'विराट कोहली पुढे म्हणाला की, 'एका अतिरिक्त फलंदाजामुळे पॉवर प्लेमध्ये २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. कारण मला माहिती आहे की आठव्या क्रमांकावर देखील फलंदाज आहे. मला वाटतं की क्रिकेटमध्ये फलंदाजांचा इतका दबदाब असू नये. बॅट आणि बॉलमध्ये समतोल असणं गरजेचं आहे.