Advertisement

बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना पुढचे 48 तास अलर्ट

प्रजापत्र | Sunday, 21/11/2021
बातमी शेअर करा

मुंबई दि.21 नोव्हेंबर – भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. पूर्व मध्य व पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे. मराठवाड्यातील बीड , उस्मानाबाद , लातूर , नांदेड या जिल्ह्यांना पुढचे 48 तास येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात धारुरसह  अनेक भागात पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.

 

याचा परिणाम महाराष्ट्रावर जाणवणार असल्याचं हवामान विभागाकडून  सांगण्यात आलं आहे. परिणामी पुढच्या 2 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आयएमडीनं  वर्तवली आहे. मच्छिमारांनी अरबी समुद्रात 21 आणि 22 नोव्हेंबरला जाऊ नये, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात  मेघगर्जनेसह पाऊस  होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

 

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पुढच्या 48 तासांमध्ये पावसाची शक्यता

अरबी समुद्रातील हवेची स्थिती पाहता प्रादेशिक हवामान विभागाकडून अंदाज जारी करण्यात आले आहेत. तर,हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सागंली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना 21 नोव्हेंबरसाठी यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, 22 नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.

 

दक्षिण भारतात पुन्हा मुसळधार

दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. हवामान विभागानं पुढच्या 48 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तामिळनाडू, कर्नाटक, केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. आंध्रप्रदेश आणि इतर राज्यात दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा  धुमाकूळ सुरु आहे. गोवा आणि तळकोकणातही पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

 

दक्षिण भारतात सुरु असलेल्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्या , एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. हावड़ा- यशवंतपुर दूरंतो एक्सप्रेस, संतरागाछी- तिरुपति एक्सप्रेस, हावड़ा- चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस, हावड़ा- तिरुचिरापल्ली एक्सप्रेस आणि हटिया- यशवंतपुर एक्सप्रेस रद्द करण्यात आलीय.

Advertisement

Advertisement