Advertisement

उद्यापासून होणार शाळा सुरु; पूर्व प्राथमिकबाबत निर्णय कधी?

प्रजापत्र | Sunday, 21/11/2021
बातमी शेअर करा

पुणे दि.21 नोव्हेंबर – राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांना देण्यात आलेली दिवाळीच्या  सुट्टया संपल्या असून सोमवार (दि.22) पासून पुन्हा शाळा सुरु होणार आहेत. पहिले सत्र संपल्यामुळे आता दुसरे सत्रही सुरू होणार आहे.

 

शिक्षण विभागाने  28 ऑक्‍टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्या देण्याचे आदेश काढले होते. 12 नोव्हेंबरला राज्यात राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण असल्याने शाळा 11 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन होते. दिवाळीच्या कमी झालेल्या सुट्टया सर्वेक्षण  झाल्यानंतर किंवा नाताळच्या कालावधीत किंवा उन्हाळी सुट्टयांमध्ये समायोजित करण्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिले होते.

 

राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने सर्वेक्षण झाल्यानंतच लगेचच दुसऱ्या दिवसापासून शाळांना पुन्हा दिवाळीच्या उर्वरित सुट्टया देण्याचा निर्णय घेतला होता. या उर्वरित सुट्टयाही संपल्या असून शाळा पुन्हा नियमितपणे सुरू होणार आहेत. शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढावी यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहेत.

पूर्व प्राथमिकबाबत निर्णय कधी?
शहरी भागातील पहिली ते सातवी व ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्गही सुरु व्हावेत अशी मागणी होऊ लागली आहे. मात्र अद्याप यावर शासनाकडून ठोस निर्णय झालेला नाही. या आठवड्याभरात याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येवू लागली आहे.

Advertisement

Advertisement