धुळे: एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपाला झुगारून धुळे बस आगारातून आज बस सेवा सुरू करण्यात आली. सरळ भरतीत निवडलेल्या चालकांच्या माध्यमातून या बस धुळे आगारातून नरडाणा, धनूर अशा ठिकाणी पाठवल्या गेल्या. मात्र पोलीस बंदोबस्त असतानाही चार बसेसवर दगडफेक झाली आहे. या चारही बस वेगवेगळ्या मार्गावर पाठवण्यात आल्या होत्या. दगडफेकीच्या घटनांमुळे नव्याने सेवेत दाखल झालेल्या चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
धुळे बस आगारातून आज बस सेवा सुरू करण्यात आली. या बसेसना पोलीस सुरक्षा देण्यात आली होती. असे असतानाही अज्ञातांकडून या बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत एक चालक जखमी झाला आहे. नरडाणा येथून धुळ्याकडे येणाऱ्या बसवर नगावबारी येथे अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीच्या घटनेत विजय भामरे हे बस चालक जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली. या घटनेवर चिंता व्यक्त करताना अधिक सुरक्षा पुरवण्याची मागणी चालकांकडून करण्यात येत आहे.