मुंबई : गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही; मात्र आता राज्यभरात एसटी बसेस काही प्रमाणात रस्त्यांवर धावायला लागल्या आहेत. आज २७ मार्गावर १४४ बसेस धावल्या असून, ३ हजार ५१८ प्रवाशांनी प्रवास केला आहे. याशिवाय कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून, आज ३ हजार ५१८ कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत.
एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपामुळे राज्यभरातील एसटीची वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी, न्यायालयाचे निर्देश असतानासुद्धा कामगार संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाकडून कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यभरात ४ हजार ३४९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एसटी कर्मचारी आणि एसटीतील रोजंदार कामगारांचा समावेश आहे. या कारवाईच्या धास्तीने कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. आज राज्यभरात ७ हजार ५४१ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यभरातून २७ मार्गांवर शिवनेरी, शिवशाही आणि साध्या अशा एकूण १४४ बसेस धावल्या आहेत. या बसेसमधून ३ हजार ५१८ प्रवाशांनी प्रवास केला आहे. आजपेक्षा काल दिवसभरात जास्त बसेस सुटल्या होत्या. काल राज्यभरातून बस संख्या १०७ सोडण्यात आली होती. ज्यामधून २ हजार ८९९ प्रवाशांनी प्रवास केला होता.