Advertisement

भीक मागून गुजराण करणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी

प्रजापत्र | Wednesday, 17/11/2021
बातमी शेअर करा

कर्नाटकमध्ये भीक मागून गुजराण करणाऱ्या एका दिव्यांग व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंची गर्दी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या आठवड्यात कर्नाटकच्या बल्लारी जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. ४५ वर्षीय बसवा उर्फ हुच्चा बस्या यांचं एका अपघातामध्ये निधन झालं. आयुष्यभर भीक मागून ते गुजराण करत होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोकांची गर्दी झाली. सोशल मीडियावर देखील यासंदर्भातले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनं आश्चर्य व्यक्त केलं. एका सामान्य भीक मागून गुजराण करणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी का व्हावी?

 

या गर्दीचं कारण बसवा यांच्या पद्धतीमध्ये दडलेलं आहे. ते भीक मागत होते त्या हदगली गावातल्या रहिवाशांसाठी बसवा गुडलक होते. बसवा लोकांकडून अवघा एक रुपया भीक घेत होते. विशेष म्हणजे लोकांनी जास्त पैसे घेण्याचा आग्रह करून देखील ते एक रुपया घेऊन उरलेली रक्कम परत देखील करत! बसवा यांना एक रुपया दिल्यानंतर काहीतरी चांगलं घडतं, अशी श्रद्धा लोकांची तयार झाली होती. यामुळे बसवा या भागात बरेच प्रसिद्ध देखील झाले होते, असं वृत्त आयएएनएसच्या हवाल्याने टाईम्स नाऊनं दिलं आहे.

 

 

गेल्या आठवड्यात शुक्रवारी बसवा यांचा अपघात झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलं. मात्र, उपचारांना यश न आल्यामुळे शनिवारी त्यांचं निधन झालं. मात्र, त्यांच्या अंत्ययात्रेसाठी त्यांच्याशी अनोखं नातं जोडलं गेलेल्या लोकांनी मोठी गर्दी केली होती. राजकीय व्यक्तींशी देखील बसवा बिनधास्तपणे संवाद साधायचे, असं देखील सांगितलं जातं.

Advertisement

Advertisement