नांदेड दि.15 नोव्हेंबर – नांदेड शहरात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज एका ट्रक मधून आणण्यात आलेला अकराशे किलो गांजा जप्त केला आहे. आंध्रप्रदेशातून ट्रक मधून हा गांजा महाराष्ट्रात आणण्यात आला होता. त्याची किंमत 5 कोटी 63 लाख रूपये इतकी असून या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. एनसीबीचे प्रमुख अधिकारी समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली. वानखेडे यांनी सांगितले की गुप्तचर सूत्रांकडून आम्हाला हा गांजा येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अमोल मोरे व सुधाकर शिंदे या दोन अधिकाऱ्यांनी सापळा लाऊन हा ट्रक पकडला त्यात 1127 किलो गांजा सापडला. हा गांजा राज्याच्या अन्य भागात नेण्यात येणार होता. राज्यात एनसीबीचे सध्या धाडसत्र सुरू असून त्यात अनेक ड्रग पेडलर्सना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून या धंद्यातील बरीच माहिती सध्या मिळत आहे. मुंबई एनसीबीने नांदेड जिल्ह्यातील नांदेड-हैदराबाद मार्गावर मंजराम (तालुका – नायगाव) येथे ही कारवाई केली. गुप्त माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने विशेष मोहीम राबवत ही कारवाई केली. 15 नोव्हेंबरला पहाटेच्या वेळी केलेल्या या कारवाईत एनसीबीने 12 चाकी ट्रक ताब्यात घेतला. यातून एकूण 1127 किलोग्रॅम गांजा जप्त केला. तसेच 2 आरोपींना अटक केली. आता आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे, अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली. ट्रकमधील हा गांजा नांदेडमधून जळगावला जाणार होता. तिथं यातील काही गांजा देऊन ही गाडी पुढे महाराष्ट्रभरात गांजाचं वितरण करणार होती. ही मुंबई एनसीबीने केलेल्या सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक मानली जात आहे. या प्रकरणी एनसीबीने 98/2021 या क्रमांकाने गुन्हा नोंद केला आहे. हा माल कुणाला पोहचवला जाणार होता याचा तपास सुरू आहे. लवकरच यातील इतर तस्करांनाही अटक केली जाण्याची शक्यता आहे.
बातमी शेअर करा