दिल्ली: अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांप्रमाणे भारतानेही करोना व्हायरसला रोखण्यासाठी स्वदेशी लशीची निर्मिती केली आहे.हैदराबाद स्थित भारत बायोटेक आणि आयसीएमआरने मिळून 'कोव्हॅक्सीन' या स्वदेशी लशीची निर्मिती केली आहे. ही लस प्राण्यांवर यशस्वी ठरल्याचा दावा भारत बायोटेक ने केला आहे.
सध्या देशभरातील १२ वैद्यकीय संस्थांमध्ये कोव्हॅक्सीन लशीच्या मानवी चाचण्या सुरु आहेत.देशात
एकाबाजूला दररोज करोना रुग्णांची संख्या वाढत असताना या कोव्हॅक्सनी लशीचा प्राण्यांवरील चाचणीचा रिपोर्ट समोर आला आहे.
लशीची मानवी चाचणी करण्याआधी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्राण्यांवर चाचणी केली जाते. त्याला प्री-क्लिनिकल चाचणी म्हणतात.कोव्हॅक्सीन प्राण्यांवरील चाचणीत प्रभावी ठरली आहे. एकूण २० माकडांना प्रत्येकी पाच याप्रमाणे चार गटांमध्ये विभागण्यात आले होते. त्यांना लशीचे दोन डोस देण्यात आले.माकडांच्या एका गटाला प्लासीबो देण्यात आला. तीन अन्य गटांना तीन वेगवेगळया प्रकारचा लशीचा पहिला डोस दिला. त्यानंतर १४ दिवसांनी दुसरा डोस दिला.१४ दिवसांनी दुसरा डोस दिल्यानंतर सर्व माकडं व्हायसरच्या संपर्कात आली. त्यानंतरच्या अभ्यासात लशीमुळे माकडांचे व्हायरसपासून संरक्षण झाल्याचे समोर आले.माकडांच्या शरीरात व्हायरसचा खात्मा करणाऱ्या अँटीबॉडीज तयार झाल्या तसेच नाक, गळा आणि फुफ्फुसांमध्ये व्हायरसचा गुणाकार थांबला.लस दिलेल्या माकडांच्या हिस्टोपॅथोलॉजिकल तपासणीत न्यूमोनियाचे कुठलेही लक्षण आढळले नाही.लशीचे दोन डोस दिलेल्या प्राण्यांमध्ये कुठलेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत.