Advertisement

गडचिरोलीत पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक

प्रजापत्र | Saturday, 13/11/2021
बातमी शेअर करा

गडचिरोली : आज सकाळी पोलीस आणि नक्षल्यावाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली असून या भीषण चकमकीत पोलिसांना सहा नक्षल्यवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  चकमकी  दरम्यान गडचिरोली पोलिसांचे तीन जवान देखील यामध्ये जखमी झाले असून त्यांना घटनास्थळावरून हेलिकॉप्टरने तात्काळ नागपूरला  हलवण्यात आले आहे. नक्षलवाद्यांच्या मृताचा आकडा वाढण्याची शक्यता आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

 

आज झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची अद्याप नेमकी ओळख पटलेली नाही. पण यामध्ये संघटनेचा मोठा नेता असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धानोरा तालुक्यातील मरदिनटोलाच्या जंगलात सकाळी  ही चकमक सुरु होती. या परिसरात अजूनही पोलिसांकडून सर्चिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळत आहे. हा परिसरल महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील घनदाट जंगलात असल्याने बाहेर संपर्क करणे कठीण होत आहे. 

 

धानोरा तालुक्यातील मरदिनटोलाच्या जंगलात काही नक्षलवादी हालचाल सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात शुक्रवारी रात्रीपासूनच सर्च ऑपरेशन सुरु केलं. त्यावेळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली. आतापर्यंत सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले असून अजून काही नक्षलवादी मृत पावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

 

या मोठ्या चकमकीनंतरही अजून लहान चकमकी सुरुच असून पोलिसानी या भागातील सर्च अभियान वाढवलं आहे. सोबत  मोठा फौजफाटा दाखल झाला आहे.

 

 मोठा नक्षली नेता मारला गेल्याची चर्चा
या चकमकीमध्ये एक मोठा नक्षलवादी नेता मारला गेल्याची चर्चा आहे. याबद्दल अद्याप पोलिसांनी काही माहिती देण्यास नकार दिला आहे. 

Advertisement

Advertisement