राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. राज्य शासनाकडून हे आंदोलन थांबवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहेत, मात्र एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असून संप सुरूच आहे. परिणामी सर्वसामान्यांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज(शनिवार) सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबतची बैठक झाली. परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळ यांच्यात ही बैठक पार पडली. त्यानंतर अनिल परब यांनी माध्यांमाना या बैठकीबाबत सविस्तर माहिती दिली.
अनिल परब म्हणाले, “समितीचा अहवाल जर लवकर देता आला तर तो देण्याचा आमचा प्रयत्न राहील. समितीचा जर विलिनीकरणाबाबतचा सकारात्मक अहवाल आला, तर शासन तो मंजूर करेल. परंतु जर समितीने नकारात्मक अहवाल दिला तर काय करायचं? यावरती देखील त्यांच्याशी चर्चा झाली. ”
“यावर त्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत. त्यांचा बऱ्याच दिवसांपासूनचा वेतन वाढीचा प्रश्न अजुनही प्रलंबित आहे. साधारण सर्व कामगारांची मानसिकता अशी आहे, की शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळालं पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, किती त्यावरती आपण बोझा घेऊ शकतो? इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे सर्व गोष्टी करायच्या असतील तर, एकंदरीत अभ्यास करून निर्णय घेण्याबाबत शासन सकारात्मक आहे. असं मी सांगितलेलं आहे.”
“त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या, त्याबाबत शासानाने सकारात्मक विचार ठेवलेला आहे. आता कामगारांशी चर्चेसाठी ते(कामगारांचं शिष्टमंडळ) गेलेले आहेत आणि कामगारांशी चर्चा करून पुन्हा एकदा भेटण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. मी माझ्याकडून सर्व प्रयत्न केलेले आहेत. संपकरी कामगारांनी संप लवकरात लवकर संप थांबवून कामावर येण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आमची कामगारांना एकच विनंती आहे. एखादी गोष्ट न्यायप्रविष्ठ असतान आडमुठे धोरण स्वीकारून कृपया हा संप अधिक वाढवू नये. कारण, एसटी अत्यंत नुकसानीत आहे. तिला त्यातून बाहेर काढण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला कामगारांनी देखील मदत केली पाहिजे.”