मुंबई:विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून रुतलेले एसटीचे चाक अखेर शुक्रवारी काहीसे हलले. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने शुक्रवारी म्हणाले, एसटी संप मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्यास सुरुवात केली. त्यानुसार आतापर्यंत १ हजार ५३२ कर्मचारी कामावर परतले.
शुक्रवारी राज्यातील विविध आगारांतून ३६ गाड्या धावल्या. त्यात मुंबई-सातारा, दादर-पुणे, स्वारगेट-ठाणे, नाशिक-पुणे, नाशिक-धुळे आदी फेऱ्यांचा समावेश आहे. संपामुळे महामंडळाचे सुमारे १२५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचाही दावा चन्ने यांनी केला. ते म्हणाले, कामावर येऊ पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांची कुठेही अडवणूक होता कामा नये यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाची मदत घेतली जात आहे. एसटीचे कर्मचारी कामावर परतावे यासाठी सरकारने आवाहन केले आहे. जे कामावर येतील त्यांना संरक्षण दिले जाईल. अनेक कर्मचारी डेपो सुरू करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे लवकरच एसटीची वाहतूक सुरू होईल. संप सुरू न ठेवता सर्वांनी रुजू व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.