Advertisement

बीड जिल्हा पोलीस दलात मोठ्या फेरबदलाचे संकेत

प्रजापत्र | Tuesday, 22/09/2020
बातमी शेअर करा

बीड : बीडच्या पोलीस अधीक्षकपदी आर. राजा यांच्या नियुक्तीनंतर आता संपूर्ण पोलीस दलातच मोठ्या फेरबदलाचे संकेत मिळत आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह पोलीस उपाधीक्षक आणि इतरही काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश येत्या २-३ दिवसात निघणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 
बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची मागील आठवड्यात बदली करण्यात आली. त्यांच्या जागी आर. राजा यांनी पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यानंतर आता पोलीस दलातील इतर अधिकाऱ्यांच्या बदलीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 
गृह मंत्रालयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार बीडच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह ३ पोलीस उपाधीक्षक आणि काही पोलीस निरीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश येत्या २-३ दिवसात निघणार आहेत. 
अतिरिक्त पोलीस अधीक्षक दर्जाच्या बदल्यांचे आदेश तर आज मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर देखील निघू शकतील असे सूत्रांनी सांगितले. यात बीडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांची बदली होणार असल्याची माहिती असून बीडला सुनील लांजेवार यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अंबाजोगाई पोलीस उपाधीक्षक म्हणून जायभाये यांची नियुक्ती होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तर माजलगावच्या पोलीस उपाधिक्षकपदी अभिजीत फस्के यांच्या नावाची चर्चा आहे. बीडचे पोलीस उपाधीक्षक भास्कर सावंत यांचादेखील बदलीची शक्यता असून त्यांच्या जागी मुंबईहून एक अधिकारी येणार असल्याची माहिती आहे. केज उपविभागासाठी देखील नवीन पोलीस उपाधीक्षक मिळणार असल्याची माहिती आहे. दरम्यान या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसोबतच काही पोलीस निरीक्षकांच्या देखील बदल्या अपेक्षित आहेत. 

Advertisement

Advertisement