पाटोदा - अहमदनगर जिल्ह्यातील मांडवगण येथील ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांडे यांनी २४ सप्टेंबर शुक्रवारी रोजी पाटोदा तालुक्यातील सौताडा धबधब्यावरुन उडी मारून येथील दरीत आत्महत्या केली. यानंतर पोलिसांनी त्यांचा दरीत मृतदेह शोधण्यासाठी शोधमोहीम सुरु केली, मात्र त्यांच्या मृतदेहाचा शोध लागला नव्हता. दरम्यान आज तब्बल आठ दिवसानंतर त्यांचा मृतदेह नदीत आढळून आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील रहिवाशी असलेले ग्रामसेवक गवांदे हे मांडवगण जवळच असणाऱ्या खांडगाव येथेच कार्यरत होते. त्यांनी पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील धबधब्यावरुन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर त्यांचा पोलिस सातत्याने शोध घेत असताना देखील मृतदेह आढळून आला नव्हता. मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शोधकार्य करताना अडथळे निर्माण होत होते. शेवटी आठ दिवसानंतर ग्रामसेवक गवांदे यांचा मृतदेह दरीत आढळून आला आहे. दरम्यान मागील आठ दिवस पाटोदा पोलिसांनी त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी शोध मोहीम राबविली होती.