मुंबई- आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा २५ आणि २६ सप्टेंबर रोजी घेतली जाणार होती. मात्र ही परीक्षा आदल्या दिवशी रात्री स्थगित करण्यात आली. यामुळं अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. आता ही आरोग्य विभागातील रद्द झालेली क आणि ड गटातील पदभरतीची परीक्षा १५-१६ किंवा २२-२३ ऑक्टोबरला होईल अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
नुकतीच रद्द झालेली परीक्षा ऐन वेळेला पुढे ढकलण्यात आली. या मागे काही उमेदवाराचं हित हाच मुद्दा असल्याचं टोपे यांनी सांगितलं असलं तरी ऐन वेळेला परीक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षा केंद्रावरती पोहोचलेल्या लाखो उमेदवारांना मनस्ताप आणि आर्थिक फटका सहन करावा लागला होता. त्यावेळेला रद्द झालेली परीक्षा होणारं की नाही याबद्दलची साशंकता होती. राजेश टोपे यांनी आज मुंबईत आरोग्य विभागाची बैठक घेतली जाईल, या बैठकीत या तारखा निश्चित केल्या जातील. १५ व १६ ऑक्टोबरला रेल्वेची परीक्षा आहे ती पुढे ढकलता आली तर प्राधान्य म्हणून याच तारखेला परीक्षा घेतली जाईल. पुढे ढकलता नाही आली तर २२ किंवा २३ ऑक्टोबरला परीक्षा होईल असे राजेश टोपेंनी सांगितले आहे.